Home Breaking News घरगुती गॅसच्या काळाबाजारावर लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना कडक कारवाईचे आदेश

घरगुती गॅसच्या काळाबाजारावर लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना कडक कारवाईचे आदेश

 

मुंबई : राज्यात घरगुती एलपीजी गॅसच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कडक पावले उचलली आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ८ मार्च २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस अधीक्षकांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

शासनाच्या आदेशानुसार घरगुती एलपीजी गॅसचा वापर करताना केंद्र सरकारच्या Ministry of Petroleum and Natural Gas, PPAC, PNGRB आणि PESO यांच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे इंधन दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता गॅस सिलेंडरचा अवैध वापर आणि काळाबाजार वाढण्याची शक्यता शासनाने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना घरगुती गॅसच्या वितरणावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर विशेष दक्षता पथके व फिरती तपासणी पथके स्थापन करून गॅस एजन्सींची नियमित तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच घरगुती गॅसचा व्यावसायिक किंवा अवैध वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून वितरण व्यवस्था सुरळीत आणि पारदर्शक ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. केलेल्या कारवाईचा अहवाल नियमितपणे शासनाला सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशावर सहसचिव अशोक आवाड यांनी स्वाक्षरी केली असून राज्यभरात गॅस काळाबाजाराविरोधात मोठी मोहीम राबवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

🙏जय विदर्भ🙏