कर्मचाऱ्यांचा आंदोलनाला दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद
वरोरा | प्रतिनिधी
लिपीक संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेलं असहकार व बेमुदत कामबंद आंदोलन आता तीव्र होत आहे. या आंदोलनाला वरोरा तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कालपासून पंचायत समिती वरोरा प्रांगणात हे आंदोलन सुरु आहे.
वेतनातील त्रुटी दूर करणे, पदनाम बदल, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे तसेच अन्य अन्यायकारक धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. ४ था, ५ वा, ६ वा आणि ७ वा वेतन आयोग लागू असतानाही लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही, अशी नाराजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनाचं नेतृत्व तालुका अध्यक्ष सुरज सुभाष तेलमोरे करत असून, त्यांच्या सोबत उपाध्यक्ष सुषमा किशोर मांढरे, सचिव यशवंत दयाराम लोहकरे, महिला संघटक प्रतीभा रविंद्र वाकडे, सीमा मनोहर भुजाडे, सुलोचना अरविंद ठोंबरे, जया ज्ञा. पुनवटकर, निरांजली जीवन कुंभारे, वनिता आसाराम धुळसे, छाया संजय चांदेकर, अर्चना विजय घुटके, माधुरी राजू शेळकी, विनोद ना. ढोके, माया अरुण ढेंगळे, अनंता नत्थुजी पडवे आणि प्रवीण ठेंगणे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
कर्मचाऱ्यांनी शासनाने तातडीने मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. पंचायत समिती प्रांगणात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनिक कामकाजावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.