⭕🙏 40 वर्षाचा पासून बस सेवा खंडित नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल 🙏⭕

४० वर्षांची बससेवा खंडित; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल

वरोरा : प्रतिनिधी

वरोरा तालुक्यातील आकोला या पुनर्वसित गावाची व्यथा सध्या गंभीर बनली आहे. गेल्या ४० वर्षांपासून सुरू असलेली बससेवा येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने मागील सात महिन्यांपासून पूर्णतः बंद आहे. परिणामी बस आकोला गावाला ‘वाकुल्या’ दाखवत गिरोला–माकोना मार्गे पुढे निघून जाते, आणि आकोलावासीयांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पारडी–आकोला–गिरोला या अवघ्या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर खड्ड्यांची चाळणी झाली असून, गिट्टी उखडल्याने वाहन चालवणेही धोकादायक बनले आहे. पावसाळ्यात खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक लहान–मोठे अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

बससेवा बंद झाल्याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना बसत आहे. आकोला गावात ७० वर्षांवरील अनेक ज्येष्ठ नागरिक असून, आरोग्यसेवेसाठी त्यांना शेगावला जावे लागते. मात्र बस नसल्याने सकाळची बस पकडण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करून पारडी गाठावी लागते. कधी बस सुटलेली असल्याने त्यांना आल्यापावली परतावे लागते.

याचप्रमाणे, शेगाव येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. सकाळी व संध्याकाळी खडतर रस्त्यावरून ठेचकाळत प्रवास करावा लागत असून, अनेकदा ज्येष्ठ नागरिक पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत वारंवार तक्रारी व व्यथा मांडूनही अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली गेलेली नाही.

  1. या पार्श्वभूमीवर, आकोला गावातील ज्येष्ठ नागरिक, प्रवासी व विद्यार्थ्यांनी वरोडा बस आगाराकडे मागणी केली आहे की, पारडी ते आकोला दरम्यान तात्पुरती ने-आण व्यवस्था सुरू करावी, जेणेकरून रस्ता दुरुस्ती होईपर्यंत किमान प्रवाशांना दिलासा मिळेल.
    शासन व संबंधित विभागांनी तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती व बससेवा पूर्ववत करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. —🙏जय विदर्भ🙏— { बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️ 8329889732 }