📰 आता पशुधनाच्या नुकसानीचीही भरपाई तात्काळ!
— आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया आणि मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांच्या उपस्थितीत निर्णय

✍️ अभिषेक भागडे, चिमूर (ता. १० नोव्हेंबर २०२५)

चिमूर तालुक्यात सध्या वाघ-मानव संघर्ष तीव्र झाला असून अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाच्या हल्ल्यात काहींना जीव गमवावा लागला, तर अनेक शेतकऱ्यांचे पशुधनही वाघाच्या हल्ल्याचा बळी ठरले आहे. आतापर्यंत जीवितहानीसाठी भरपाई दिली जात असली, तरी पशुधनाच्या नुकसानीवर तात्काळ मदत मिळत नव्हती. मात्र, आता या नुकसानीची भरपाई ‘तात्काळ’ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शुक्रवारी आमदार कीर्तिकुमार भांगडिया (बंटी भाऊ) यांच्या उपस्थितीत मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या शंकरपूर, आंबोली, शिवरा, चिचाळा शास्त्री, मासळ, तुकूम, सातारा, बामणगाव, कोलारा, टेकेपार आदी गावांमध्ये वाघाचा धुमाकूळ सुरू असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर मदनापूर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत वाघाच्या हल्ल्यांची वारंवारता असलेल्या गावांमध्ये तार कंपाउंड उभारणे, वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविणे आणि ध्वनी देणारे कॅमेरे बसविणे यासारखे ठोस निर्णय घेण्यात आले.

तसेच गावकऱ्यांशी अधिक चांगला समन्वय साधण्यासाठी ‘चावडी चर्चा’ हा उपक्रम सुरू करण्याचे ठरविण्यात आले असून, वाघ अचानक दिसल्यास नागरिकांनी कसे वागावे, कोणती खबरदारी घ्यावी याबाबत वन अधिकारी मार्गदर्शन करतील, असे बैठकीत ठरले.

या बैठकीस प्रादेशिक डीएफओ डॉ. कल्याणकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, ठाणेदार दिनेश लबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी, तसेच भाजप पदाधिकारी राजू देवतळे, मनीष तुम्पल्लीवर, कमल असावा, गजानन गुळधे, प्रफुल कोलते (शंकरपूर), प्रमोद श्रीरामे (खडसंगी), सचिन डाहुले (कोलारा उपसरपंच), घनशाम डुकरे, प्रवीण गणोरकर (मासळ) आदी उपस्थित होते.

बैठकीला वन्यजीवप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या निर्णयामुळे वाघांच्या हल्ल्यांमुळे हवालदिल झालेल्या शेतकरी व पशुपालकांना दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार भांगडिया यांनी व्यक्त केला.

—🙏 जय विदर्भ 🙏—


( बातम्या व जाहिराती करता संपर्क साधा ☎️9673574711☎️8329889732