कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल

मंगळवारी होणार सुनावणी

पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट आहे. या घटनेविरोधात देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थीही आंदोलन करत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती जेबी पराडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठात मंगळवारी सुनावणी होणार आहे.प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टवर पाशवी अत्याचाराच्या घटनेने देशातील राजकारण तापले आहे. तसेच, देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय महिविद्यालयांचे विद्यार्थी याविरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान, 17 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीशांना पाठवलेल्या या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती.


 

राज्यात सात दिवसांत जोरदार पाऊस पडणार

पंजाबराव डख यांचा अंदाज

राज्यातील शेतकरी राजासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 18 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या सात दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडणार आणि आठवडाभर वरुण राजा हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केलाय.मुंबईतही या दरम्यान पाऊस पडेल. याशिवाय विदर्भातील बुलढणा, अकोला, अमरावती, वर्धा ,नागपुर ,यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावेल. तर मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर, बीड परभणी ,जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यात पाऊस बरसेल, असा अंदाजही डख यांनी व्यक्त केला. शिवाय उत्तर महाराष्टात नाशिक , नंदुरबार आणि धुळ्यात पाऊस पडेल, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पाऊस पडू शकतो, असंही डख यांनी स्पष्ट केलं.

——–
राज्यातील मोठ्या बँकेला RBI चा दणका

1.27 कोटींचा ठोठावला दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील बँक ऑफ महाराष्ट्राला दणका दिला आहे. ग्राहकांसाठीच्या केवायसीसह विविध निर्देशांचे पालन न केल्याबद्दल या नामांकित बँकेला 1.27 कोटींचा दंड ठोठावला आहे. 8 ऑगस्ट 2024 रोजी याविषयीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, बँकेला मोठा दणका देण्यात आला. तर आरबीआयने दोन NBFC ना दंड ठोठावला आहे.बँक ऑफ महाराष्ट्राने बँक कर्ज वितरण सिस्टिम, बँकेची सायबर सुरक्षा यंत्रणा आणि नो युवर कस्टमर, केवायसी बाबत आरबीआयच्या काही निर्देशांचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. बँकेवर 1.27 कोटींचा दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात आली. याशिवाय रिझर्व्ह बँकेने हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेडवर केवायसी निर्देशांचे पालन न केल्याने 2016 मधील केवायसी नियमानुसार कारवाई केली. हिंदुजा फायनान्सला 4.90 लाख रुपयांचा दंड ठोठावला. तर पुनावाला फिनकॉर्प लिमिटेडवर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

———

संभाजी ब्रिगेडची उद्धव ठाकरेंना ऑफर

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग

संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला ठाणे जिल्हा अध्यक्षांसह इतर जिल्हाध्यक्षही उपस्थित होते. विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या सर्वच पक्ष जोमाने तयारी लागले आहेत. त्यातच आता संभाजी ब्रिगेडने एक मोठी घोषणा केली आहे. “ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही विधानसभेसाठी 25 जागा मागितल्या आहेत. आमच्याकडून निवडणूक लढण्यास अनेक जण इच्छुक आहेत. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा लढू”, असे विधान संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख मनोज आखरे यांनी केले. ते ठाण्यात बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतंच संभाजी ब्रिगेडची ठाण्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. ठाण्यात जिल्हाध्यक्षांचे विश्रामगृह येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला ठाणे जिल्हा अध्यक्षांसह इतर जिल्हाध्यक्षही उपस्थित होते. आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे 25 जागांची मागणी केली आहे. त्याबद्दल चर्चा होईल.असे मनोज आखरे म्हणाले.

———-