Home जिल्हा खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या थेट हस्तक्षेपाने मनपा कर्मचाऱ्यांना न्याय. चंद्रपूर  मनपातील ११७...

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या थेट हस्तक्षेपाने मनपा कर्मचाऱ्यांना न्याय. चंद्रपूर  मनपातील ११७ कामगारांच्या मानधन वाढीचा प्रश्न मार्गी

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेत ‘दुर्गेश इंडस्ट्रियल सेक्युरिटी प्रा. लि.’ एजन्सीमार्फत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत आणि मानधनाच्या प्रलंबित प्रश्नांवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेत हा विषय यशस्वीपणे मार्गी लावला आहे. मनपात आतापर्यंत अवघ्या १२ ते १६ हजार रुपयांच्या अनियमित वेतनावर काम करणाऱ्या ११७ कर्मचाऱ्यांना योग्य वेतनश्रेणी व न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वात ठोस पावले उचलण्यात आली आहेत. यामध्ये २१ हजार रुपये अर्धकुशल आणि २० हजार रुपये अकुशल कर्मचाऱ्यांसह सर्व कामगारांची पदांनुसार योग्य वर्गवारी निश्चित करून त्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.



खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे आणि ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आज चंद्रपूर येथील खासदार जनसंपर्क कार्यालयात शेकडो कामगारांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. वर्षानुवर्षे तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याप्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मनापासून आभार मानले असून, संपूर्ण कामगार वर्गात सध्या प्रचंड समाधानाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.



दरम्यान, कामगारांच्या आर्थिक हक्कांचे व सामाजिक संरक्षणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारची अनियमितता राहू नये यासाठी प्रशासनाला कडक सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित कामगारांच्या वेतनाबाबतची अधिकृत ‘पेमेंट स्लिप’ थेट खासदार कार्यालयात सादर करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला देण्यात आले असून, यामुळे कामगारांचे आर्थिक शोषण थांबून प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता येणार आहे.