Home Breaking News मूलचे ‘शिवार’ व राजुराचे ‘नागराज कॅफे’ निलंबीत; अन्न व औषध प्रशासनाची धडक...

मूलचे ‘शिवार’ व राजुराचे ‘नागराज कॅफे’ निलंबीत; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई.

चंद्रपूर :-वारंवार नोटीस बजावूनही स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य अहवालाबाबत हलगर्जी केल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने मूल येथील ‘शिवार हॉटेल’ तसेच राजुराचे ‘नागराज कॅफे’ यांचे परवाने तात्पुरते स्थगित (निलंबित) केले आहेत. त्रुटी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे दोन्ही हॉटेल्स बंद राहणार आहेत. शुक्रवारी, ७ ऑगस्टला ‘नागराज कॅफे’वर केलेल्या कडक कारवाईने हॉटेल व्यावसायिकांमध्ये धडक भरली आहे.



चार महिन्यांत १३३ तपासण्या आणि ६३ लाखांची जप्ती
चार महिन्यांत या विभागाने लक्षापेक्षा जास्त म्हणजेच १३३ तपासण्या केल्या असून, एकूण ६३ लाख रुपयांची विक्रमी जप्ती केली आहे. गत वर्षांत या विभागाने ६५ लाखांची जप्ती केली होती. विशेष म्हणजे, शिवार आणि नागराज कॅफेचे परवाने निलंबनाची मोठी कारवाई झाली असून, अस्वच्छता, कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी अहवाल सादर न करणे, ‘एनएबीएल’ या अधिकृत प्रयोगशाळेचे अन्न तपासणी अहवाल न देण्याचा ठपका या हॉटेल्सवर ठेवला आहे. तसेच चंद्रपूरच्या ‘रसराज’ रेस्टॉरंट व वन अकादमीच्या ‘कंटीन’लाही सुधार नोटीस बजावण्यात आली आहे.



५० कोटींची उलाढाल असणाऱ्यांवरच कारवाईचा अधिकार :- सहायक आयुक्त प्रवीण उमप
याबाबत माहिती देताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण उमप यांनी स्पष्ट केले की, आम्हाला ५० कोटींपर्यंतची उलाढाल असलेल्या युनिटवरच कारवाईचा अधिकार आहे. त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेल्यांवर कारवाई करण्याचे अधिकार केंद्रीय विभागाचे आहेत. त्यामुळे अशा तेल कंपन्या व अन्य उत्पादन केंद्रांवर कारवाई करता येत नाही. परंतु, आमच्या अखत्यारीत येणाऱ्यांना आणि नियम तोडणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.



स्ट्रीट फूड, डेअरी आणि इतर कारवायांचा तपशील 
🔳 चंद्रपुरातील ‘स्ट्रीट फूड’च्या १६ स्टॉलवर कारवाई करीत १ लाख २० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
🔳 शहरातील सपना डेअरी, भाग्यश्री डेअरी व ताडोबाच्या नवेगाव द्वारावरील झरणा रिसॉर्टवर पनीर म्हणून ‘चिज एनॅलोग’ विकल्याने कारवाई करण्यात आली आहे.
🔳 तब्बळ २२ हजार किलो रिफाईन सोया ऑईल, गुळ, एनॅलोग चिज इत्यादींची जप्ती झाली असून, हा मुद्देमाल ११ लाख १५ हजार रुपयांचा आहे.
🔳 विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट, स्ट्रीट फूडच्या स्टॉलस्वरून ९३ नमुने घेतले असून, त्यांचा अहवाल यायचा आहे.
🔳 प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या ३० कारवाया झाल्या असून, १२ किलो गुटखा, तंबाखू, पान मसाला अशी २५ लाखांची जप्ती करण्यात आली आहे.
🔳 तसेच २६ लाखांच्या ५ गाड्यांचीही जप्ती झाली असून, भिसळयुक्त दुधाच्या २५ कारवाया झाल्या आहेत आणि त्यातील बरेच अहवाल प्रलंबित आहेत.
🔳 तुकूम रस्त्यावर उघडपणे मांस विक्री करणाऱ्यांना पोलीस, मनपा व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे तंबी दिली आहे.
या सर्व कारवाया अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण उमप, अन्नसुरक्षा अधिकारी मेघा फडके, कुणाल मुळे, प्रणय कांबळे, उमेश कापगते यांनी केल्या आहेत.