वरोरा :- वरोरा शहरातील प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत येणाऱ्या ‘यात्रा वार्ड’ परिसरात आज एका दुकानाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्राप्त माहितीनुसार, सदर दुकान हे सविता एकरे (रा. नंदोरी) यांच्या मालकीचे आहे. आज अचानक दुकानातून धूर निघत असल्याचे पाहून परिसरात खळबळ उडाली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशामक दलाच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने आणि जिद्दीने कामगिरी करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. जवानांच्या या तत्परतेमुळे आग आजूबाजूच्या दुकानांना किंवा घरांना लागण्यापासून वाचली आणि मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या या ‘आक्रमक’ कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




