राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, १६ जानेवारीला निकाल
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहेत. तर मतमोजणी व निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहेत. या निवडणुकांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांकडून अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत राबवली जाणार आहे. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२५ रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. छाननीनंतर उमेदवारांना २ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत.
अर्ज माघारीनंतर ३ जानेवारी २०२६ रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी रंगणार असून सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवरील सत्ता, विकासकामांचे मुद्दे, नागरिकांचे मूलभूत प्रश्न, पाणी, रस्ते, स्वच्छता, करप्रणाली यासारखे विषय या निवडणुकांमध्ये केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
१५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठरलेल्या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे अवघ्या २४ तासांत जनतेचा कौल स्पष्ट होणार आहे.
या २९ महापालिकांच्या निवडणुका राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असून, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही या निकालांकडे राजकीय शक्तिपरीक्षण म्हणून पाहिले जात आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. —🙏जय विदर्भ 🙏—{ बातम्या आणि जाहिराती करता संपर्क साधा. ☎️9673574711☎️ 8329889732}




