स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल – खास सविस्तर बातमी
हिवाळी अधिवेशनात विदर्भाचा ज्वलंत मुद्दा धारदारपणे मांडणारे विदर्भवादी नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार
नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधिमंडळात आज विदर्भाच्या बाजूने जोरदार आवाज घुमला. राज्याचे माजी मंत्री व विदर्भवादी भूमिका ठामपणे मांडणारे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सरकारवर रोखठोक टीका करत विदर्भाच्या विकास प्रश्नांवर का मौन? असा थेट सवाल उपस्थित केला.
विधानसभा सभागृहात बोलताना त्यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे विदर्भाकडे विकासाच्या नावाखाली डावलले जाते. अधिवेशन नागपूरला असतानाही विदर्भाच्या विधीमंडळ विकास मंडळाबाबत एकही शब्द न काढणाऱ्या सरकारवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.
“इथे फक्त हुरडा खायला येतात… पण विदर्भाच्या प्रश्नांना धुळफेक करतात!” असे मार्मिक विधान करत त्यांनी राज्य सरकारची झोप उडवली.
◾ विधीमंडळ विकास मंडळाची मागणी पुन्हा ऐरणीवर
मुनगंटीवार म्हणाले की, मराठवाड्यासाठी जसे स्वतंत्र विधीमंडळ विकास मंडळ कार्यरत आहे, तसेच मंडळ विदर्भासाठीही सुरू करावे, ही मागणी नवीन नाही. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह १२ खासदार आणि आमदारांचे पत्र सरकारकडे आधीच गेले आहे, परंतु त्यावर अजूनही कारवाई झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
◾ “विदर्भासाठी सरकार गंभीर नाही!”
मांडणीदरम्यान त्यांनी स्पष्ट केले की, शासनाने जर खरोखरच समान विकासाचा विचार केला असता तर विदर्भासाठी स्वतंत्र विकास मंडळ सुरू करण्यास विलंब झाला नसता. नागपूर अधिवेशन असूनही राज्य सरकार विदर्भाच्या ज्वलंत मागण्यांकडे पाहण्यास तयार नाही, असा आरोप त्यांनी केला.
◾ विधानसभा अध्यक्षांकडेही पाठपुरावा
या विषयाची दखल घेत विधीमंडळ विकास मंडळाच्या प्रस्तावाला तात्काळ चालना देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी सभागृहातून अध्यक्षांकडे केली. यावेळी काही सदस्यांनीही मुनगंटीवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
◾ विदर्भवाद्यांचा आवाज बुलंद
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मांडणीमुळे आज सभागृहात विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला.
विदर्भाच्या विकासाबाबत चाललेली कायमची हेळसांड, रोजगाराच्या संधी, सिंचनाची कमतरता, शेतकऱ्यांचे प्रश्न—या सर्व मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी सरकारला जाब विचारला.
—
स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टलचे मत:
विदर्भाच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या नेत्यांमध्ये मुनगंटीवार यांची घणाघाती भूमिका महत्त्वाची आहे. हिवाळी अधिवेशनात त्यांनी उचललेला विषय हा आगामी काळात मोठा राजकीय आणि विकासाचा मुद्दा ठरणार आहे.
विदर्भासाठी स्वतंत्र विधीमंडळ विकास मंडळ स्थापन होण्याची अपेक्षा अधिक बळकट झाली आहे.
✍️ अभिषेक भागडे
—🙏 जय विदर्भ 🙏—{ बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️ 8329889732 }




