मनीष सिसोदियांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर

मनीष सिसोदियांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर
Supreme Court granted bail to Manish Sisodia

नवी दिल्ली:- दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (Money laundering)प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. गेल्या 17 महिन्यांपासून ते तुरुंगात होते.

सर्वोच्च न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे ते आता तुरुंगातून बाहेर येणार आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया यांना त्यांचा पासपोर्ट सरेंडर करावा लागणार आहे. तसेच, दर सोमवारी तपास अधिकाऱ्याकडे हजेरी लावावी लागणार आहे. मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने सांगितले की, मनीष सिसोदिया दीर्घकाळ तुरुंगात आहेत, त्यामुळे त्यांना जलद सुनावणीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे, हा सिद्धांत ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टाने समजून घेण्याची वेळ आली आहे. मनीष सिसोदिया यांना जामिनासाठी ट्रायल कोर्टात पाठवणे हा न्यायाचा अपमान झाल्यासारखे होईल, त्यामुळे आम्ही त्यांना जामीन मंजूर करीत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.