Home जिल्हा भद्रावतीतील ‘वीज लपंडावा’चा वीज महामंडळाला दणका; १५ दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा...

भद्रावतीतील ‘वीज लपंडावा’चा वीज महामंडळाला दणका; १५ दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

भद्रावती :- भद्रावती शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अघोषित वीज कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसा आणि रात्रीच्या वेळी सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या अनागोंदी कारभाराविरुद्ध शिवसेनेचे आक्रमक रूप समोर आले आहे. आज, २७ जून २०२६ रोजी शिवसेना लोकसभा संघटक मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने थेट विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.




💠💠 शिष्टमंडळाचा आक्रमक पवित्रा 💠💠
शहरातील नागरिकांच्या होणाऱ्या हाल अपेष्टांची दखल घेत, शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या नेतृत्वात भद्रावती नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रफुलभाऊ चटकी , नगरसेवक  महेश जीवतोडे , राहुलभाऊ सोनटक्के  आणि माजी नगरसेवक राजुभाऊ सारंधर यांनी वरोरा विद्युत उपविभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (EE) नवघरे  आणि भद्रावती विद्युत कार्यालयाचे कार्यकारी अभियंता चौरसिया यांची भेट घेतली.
यावेळी शिष्टमंडळाने वीज विभागाच्या भोंगळ कारभारावर जोरदार टीका करत, नागरिकांना सहन करावा लागत असलेल्या नाहक त्रासाचा पाढा वाचला. तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा शिवसेनेच्या शैलीत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.




💠💠 १५ दिवसांची डेडलाईन  💠💠
शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे विद्युत विभागाचे धाबे दणाणले आहेत. चर्चेअंती, विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील **१५ दिवसांच्या आत** भद्रावती शहरातील वीज पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचे ठोस आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.




💠💠 शिवसेनेचा इशारा 💠💠
“नागरिकांच्या पैशातून पगार घेणाऱ्या वीज विभागाने आपली जबाबदारी ओळखावी. १५ दिवसांत जर परिस्थिती सुधारली नाही, तर महावितरणला होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल,” अशी स्पष्ट भूमिका यावेळी मुकेशभाऊ जीवतोडे यांनी मांडली.

आता वीज विभाग आपल्या आश्वासनाची पूर्तता करतो की पुन्हा एकदा नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.