‘वरोरा :-निलजई, आमडी आणि परिसरातील नागरिकांच्या नशिबी असलेला निकृष्ट रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सुरू झालेले रस्ते नूतनीकरण अवघ्या चार दिवसांतच उखडले असून, कंत्राटदाराच्या या ‘बनावट विकासा’मुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. डांबराऐवजी ‘वेस्टेज ऑईल’चा वापर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई न झाल्यास, यापुढे तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
“हाताने उखडतोय रस्ता: कंत्राटदाराचा गंभीर निष्काळजीपणा”
‘जय गिरनारी कन्स्ट्रक्शन’च्या माध्यमातून होत असलेले हे काम म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कंत्राटदाराने नियमांना धाब्यावर बसवून अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरले आहे. रस्ता तयार होऊन चार दिवस उलटत नाहीत तोच, तो हाताने उखडला जात आहे. हा रस्ता नसून केवळ काळ्या तेलाचा मुलामा असल्याचे स्पष्ट झाले असून, यात सरकारी निधीची मोठी लूट झाली आहे.
🔴 प्रशासनाच्या ‘साखरझोपे’वर ग्रामस्थांचा संताप 🔴
रस्त्याची दुर्दशा सोशल मीडियावर व्हायरल होऊनही, संबंधित विभागाचे अभियंते आणि ग्रामपंचायत प्रशासन अद्याप गप्प का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. कंत्राटदार आणि प्रशासनाचे साटेलोटे असल्याचा आरोप करत, नागरिकांनी आता प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध केला आहे.
🙏आंदोलनाची धार तीव्र होणार 🙏
आता केवळ कागदी तक्रारी करून चालणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे:
१. तातडीने कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी.
२. संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करावी.
३. रस्ता तत्काळ दर्जेदार पद्धतीने पुन्हा करून द्यावा.
या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील, अशा आक्रमक पवित्र्यात निलजई आणि आमडीचे रहिवासी आहेत.
🙏जय विदर्भ🙏




