Home जिल्हा जिवतीतील कष्टकरी शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी खासदार प्रतिभा धानोरकरांचा संसदेत लढा.चंद्रपूर जिल्ह्यातील वनजमीन धारक...

जिवतीतील कष्टकरी शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी खासदार प्रतिभा धानोरकरांचा संसदेत लढा.चंद्रपूर जिल्ह्यातील वनजमीन धारक शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण.

 

चंद्रपूर : दशकांपासून जमिनीवर घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्याला नियमांच्या साखळदंडात किती काळ अडकवून ठेवणार असा संतप्त सवाल करत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत जिवती तालुक्यातील वनजमीन धारक शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. जिवतीमधील आदिवासी आणि बिगर-आदिवासी शेतकरी पिढ्यानपिढ्या ज्या जमिनी कसत आहेत, त्यांचा मालकी हक्क नाकारणाऱ्या जाचक अटी तातडीने रद्द करून त्यांना जमिनीचे पट्टे देण्याची आग्रही मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

लोकसभेत बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वनहक्क कायद्यांतर्गत असलेल्या ‘तीन पिढ्यांच्या पुराव्याच्या’ अटीवर टीका केली. त्या म्हणाल्या की, “जिवती तालुक्यातील शेतकरी वर्षानुवर्षे या जमिनीवर घाम गाळत आहेत, मात्र जमिनीचे पट्टे मिळवण्यासाठी ७५ वर्षांचे किंवा तीन पिढ्यांचे पुरावे मागणे ही अट अत्यंत जाचक आहे. अनेक गरीब शेतकऱ्यांकडे एवढे जुने कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांचे दावे फेटाळले जात आहेत, हा त्यांच्यावर मोठा अन्याय आहे.”

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ही ७५ वर्षांची अट रद्द करून, जे शेतकरी प्रत्यक्ष जमिनीचा ताबा ठेवून ती कसत आहेत, त्यांच्याच नावे जमिनीचे पट्टे करण्यात यावेत अशी मागणी केली. वनविभागाच्या जाचक नियमांमुळे शेतकरी हक्काच्या जमिनीपासून दूर राहत असून, त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या कायद्यात तातडीने सुधारणा करून शेतकऱ्यांना मालकी हक्क बहाल करावा, अशी मागणी त्यांनी संसदेत केली.

“शेतकरी हा देशाचा कणा आहे, परंतु नियमांच्या जाळ्यात अडकल्यामुळे त्यांना त्यांच्याच घामाच्या जमिनीचा मालकी हक्क मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. जोपर्यंत या जिवतीमधील शेतकऱ्यांच्या कष्टाला पूर्ण न्याय मिळत नाही आणि त्यांना जमिनीचे पट्टे हाती मिळत नाहीत, तोपर्यंत माझा हा लढा संसदेत आणि बाहेरही असाच सुरू राहील,” असा ठाम निर्धार खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला. या मागणीमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील वनजमीन धारक शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏