चंद्रपूर :-
वरोरा येथील ‘स्नेहा एच.पी. गॅस एजन्सी’मध्ये घरगुती गॅस सिलिंडर वितरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि गैरव्यवहार होत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कडक पावले उचलली असून, संबंधित एजन्सीचा स्फोटक परवाना रद्द करून ती इतर एजन्सीला संलग्न करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे गॅस ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या वितरकांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकी घटना काय?
स्नेहा गॅस एजन्सीबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची दखल घेत दि. २८ मार्च २०२६ रोजी गोदाम व्यवस्थापक श्री. ए.टी. भंडारवाड आणि तहसील कार्यालयातील लिपीक श्री. शिरीष मेंढे यांच्या पथकाने एजन्सीची प्रत्यक्ष तपासणी केली. या तपासणी दरम्यान व्यवस्थापनाकडून तपासणी पथकाला सहकार्य करण्यात आले नाही, मात्र पथकाने अनेक गंभीर त्रुटी शोधून काढल्या.
🛑 तपासणीत उघड झालेले गंभीर मुद्दे 🛑
👉 जाणीवपूर्वक घरपोच सेवा बंद: एजन्सीकडे गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही, ग्राहकांना घरपोच वितरण जाणीवपूर्वक बंद करण्यात आले होते. यामुळे सामान्य ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
👉 अतिरिक्त पैशांची वसुली: गोदामातून सिलिंडर वितरित करताना प्रत्येक सिलिंडरमागे ५५ रुपये अतिरिक्त आकारले जात होते. या माध्यमातून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे.
👉 कायद्याचे उल्लंघन: एजन्सीचे हे कृत्य ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (रेग्युलेशन ऑफ सप्लाय अँड डिस्ट्रिब्युशन) आदेश, २०००’ आणि ‘अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५’ मधील कलम ३ चे थेट उल्लंघन ठरते.
कडक कारवाईचे संकेत
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या अहवालाच्या आधारे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे (HPC) विभागीय विक्री अधिकारी श्री. आकाश गौर यांना पत्र पाठवून सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. एजन्सी प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने तिचा स्फोटक परवाना रद्द करावा आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ही एजन्सी तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या एजन्सीला जोडावी, असा प्रस्ताव देण्यात आला आहे.
या कारवाईमुळे वरोरा परिसरातील गॅस ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, जादा पैसे उकळणाऱ्या आणि सेवा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या इतर एजन्सींचेही धाबे दणाणले आहेत.
🙏 जय विदर्भ 🙏




