Home जिल्हा वरोरा-आजनसरा बस सेवा तात्काळ सुरू करा; भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र सवाई यांची वरोरा...

वरोरा-आजनसरा बस सेवा तात्काळ सुरू करा; भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र सवाई यांची वरोरा आगाराकडे मागणी

वरोरा  :- अभिषेक किशोर भागडे
प्रसिद्ध  तीर्थक्षेत्र असलेल्या आजनसरा येथे भाविकांची होणारी अफाट गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता, वरोरा आगाराने वरोरा-आजनसरा बस सेवा तात्काळ सुरू करावी, अशी आग्रही मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सवाई यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले असून परिसरातील नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.

भक्तांचे श्रद्धास्थान: श्री संत भोजाजी महाराज संस्थान
आजनसरा हे गाव श्री संत भोजाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले विदर्भातील एक अत्यंत भक्तिमय गाव आहे. या ठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी केवळ चंद्रपूर जिल्ह्यातूनच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सण-उत्सव आणि एकादशीच्या काळात ही गर्दी लाखांच्या घरात जाते.
प्रवाशांची मोठी कोंडी
सध्या वरोरा ते आजनसरा या मार्गावर नियमित बस सेवेचा अभाव असल्याने भाविकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून, विशेषतः वृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. परिसरातील अनेक गावांतील नागरिक वरोरा शहरात कामासाठी येतात, त्यांनाही बस नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राजेंद्र सवाई यांचा पाठपुरावा
या समस्येची दखल घेत भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र सवाई यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. “आजनसरा हे धार्मिक पर्यटनाचे केंद्र असल्याने या मार्गावर बस सुरू केल्यास महामंडळाच्या उत्पन्नातही मोठी भर पडेल आणि हजारो भाविकांचा प्रवास सुखकर होईल. जर ही मागणी लवकर पूर्ण झाली नाही, तर जनभावना लक्षात घेता पुढील पावले उचलली जातील,” असा इशारा सवाई यांनी दिला आहे.
आता वरोरा आगार प्रशासन या मागणीवर किती लवकर अंमलबजावणी करते, याकडे सर्व भाविकांचे लक्ष लागले आहे.

🙏 जय विदर्भ🙏