Home जिल्हा लोहाडोंगरी खाण प्रकल्प रद्द करा, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागतील! खासदार प्रतिभा धानोरकर...

लोहाडोंगरी खाण प्रकल्प रद्द करा, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागतील! खासदार प्रतिभा धानोरकर यांची दिल्लीत केंद्रीय कोळसा मंत्र्यांकडे आक्रमक मागणी

चंद्रपूर : – अभिषेक भागडे

चंद्रपूर जिल्ह्यातील लोहाडोंगरी येथील प्रस्तावित कोळसा खाण प्रकल्पामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होणार असून, शेतकऱ्यांचे जनजीवन उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन हा विनाशकारी प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.
व्याघ्र भ्रमणमार्ग धोक्यात; प्रकल्प रद्द करण्याची मागणी
खासदार धानोरकर यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की, लोहाडोंगरी हा परिसर वाघांसाठी महत्त्वाचा ‘कॉरिडॉर’ (भ्रमणमार्ग) आहे. जर या ठिकाणी खाणकाम सुरू झाले, तर:
👉 वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचा नाश होईल.
👉 मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होऊन निष्पाप नागरिकांचे बळी जातील.
👉 परिसरातील जैवविविधतेचे कधीही भरून न निघणारे नुकसान होईल.
त्यामुळे निसर्ग आणि मानव या दोघांच्या हितासाठी हा प्रकल्प रद्द करावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
वेकोलीच्या जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता करा!
केवळ लोहाडोंगरीच नव्हे, तर वणी, बल्लारपूर, माजरी आणि वणी-नॉर्थ क्षेत्रातील वेकोलीग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथाही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडल्या.
👉 अधुऱ्या जमिनींचे संपादन: पवन खाण, विरूर-गाडेगाव, पैनगंगा, निलजई अशा प्रकल्पांसाठी जमिनी घेतल्या, पण तांत्रिक कारणे पुढे करून उर्वरित जमिनी वेकोली ताब्यात घेत नाहीये. यामुळे शेतकऱ्यांना तिथे ना शेती करता येते, ना मोबदला मिळतो.
👉 मातीचे ढिगारे आणि बंद रस्ते: खाणींतील मातीचे ढिगारे शेतशिवाराजवळ टाकल्याने पिकांचे नुकसान होत असून, शेतात जाण्याचे रस्तेही बंद झाले आहेत.
👉 नदी प्रवाहांची छेडछाड: वेकोलीने नैसर्गिक प्रवाह बदलल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत.
संयुक्त बैठकीचे नियोजन आणि मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार धानोरकर यांनी वेकोलीचे अध्यक्ष आणि सर्व क्षेत्रीय महाव्यवस्थापकांसोबत मंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने संयुक्त बैठक लावण्याची विनंती केली. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या प्रश्नांचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
👉 “पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही माझी प्राथमिकता आहे. वेकोलीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत माझा हा पाठपुरावा सुरूच राहील.”
🛑 खासदार  प्रतिभा धानोरकर 🛑

प्रभाव :- खासदार धानोरकर यांच्या या दिल्लीवारीमुळे आणि थेट केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या आक्रमक पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रलंबित प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

🙏 जय विदर्भ 🙏