Home जिल्हा वरोरा येथे स्नेहा गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहकांची लूट सुरूच! नगरसेवक प्रवीण...

वरोरा येथे स्नेहा गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहकांची लूट सुरूच! नगरसेवक प्रवीण चिमूरकर यांची तहसीलदारांकडे तक्रार; घरपोच सेवा बंद केल्याने संताप

वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
येथील स्नेहा गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराचा फटका वरोरा शहरातील हजारो ग्राहकांना बसत असून, एजन्सीकडून ग्राहकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत नगरसेवक श्री. प्रवीण चंपतराव चिमूरकर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून स्नेहा गॅस एजन्सीने शहरातील घरपोच गॅस वितरण सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केली आहे. ग्राहकांना स्वतःच्या खर्चाने गोदामावर जाऊन गॅस सिलिंडर आणावे लागत आहेत. विशेष म्हणजे, गॅसच्या किमतीमध्ये घरपोच सेवेचे शुल्क (Delivery Charges) अंतर्भूत असतानाही, एजन्सी ग्राहकांना सवलत न देता पूर्ण रक्कम वसूल करत आहे.
गणितातून उघड झाली लाखोंची लूट
नगरसेवक चिमूरकर यांनी निवेदनात नमूद केल्याप्रमाणे:
👉 एका सिलिंडरमागे घरपोच सेवेचे ₹३५ आणि गाडीभाड्याचे ₹२०, असे एकूण ₹५५ एजन्सी वाचवत आहे.
👉 एका गाडीमध्ये साधारण ३४२ सिलिंडर असतात. त्या हिशोबाने एका गाडीमागे ₹१८,८१० रुपयांचा अतिरिक्त नफा एजन्सी कमवत आहे.
👉 गेल्या सहा महिन्यांचा हिशोब केल्यास हा आकडा लाखोंच्या घरात जातो. ग्राहकांकडून पूर्ण पैसे घेऊनही त्यांना गोदामापर्यंत पायपीट करायला लावणे, हा शुद्ध फसवणुकीचा प्रकार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
👉 “गॅस एजन्सीकडे विचारणा केली असता ते ‘मजूर मिळत नाहीत’ असे कारण सांगतात. मात्र, प्रत्यक्ष मजुरांशी संवाद साधला असता, एजन्सी आम्हाला कामच देत नाही आणि गेल्या १५ दिवसांपासून आम्ही घरीच बसून आहोत, असे मजुरांनी सांगितले. याचा अर्थ एजन्सी मालक स्वतःच्या फायद्यासाठी मुद्दाम ही सेवा खंडित करत आहेत.”
प्रवीण चिमूरकर, नगरसेवक तथा ( माजीसैनिक )

प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
शहरातील सामान्य जनता, गृहिणी आणि वृद्ध नागरिकांना सिलिंडर वाहून नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून, स्नेहा गॅस एजन्सीला घरपोच सेवा पुन्हा सुरू करण्याचे आदेश द्यावेत आणि ग्राहकांची लूट थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता यावर तहसीलदार काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण वरोरा शहराचे लक्ष लागले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏