Home महाराष्ट्र चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन ‘मृत्यूचा सापळा’; तातडीने ‘पर्यावरणीय ऑडिट’ करा! खासदार प्रतिभाताई...

चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन ‘मृत्यूचा सापळा’; तातडीने ‘पर्यावरणीय ऑडिट’ करा! खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी संसदेत कडाडून मांडली चंद्रपूरकरांची व्यथा; ‘शून्य प्रहरा’त वेधले सरकारचे लक्ष

नवी दिल्ली / चंद्रपूर :- अभिषेक भागडे
“संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाश देणारा चंद्रपूर जिल्हा आज स्वतः प्रदूषणाच्या अंधारात जळत आहे. राज्याचे ऊर्जेचे इंजिन मानले जाणारे हे केंद्र आज तिथल्या सामान्य जनतेसाठी ‘मृत्यूचा सापळा’ बनत आहे,” अशा तीव्र शब्दांत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आज लोकसभेच्या ‘शून्य प्रहार’मध्ये (Zero Hour) चंद्रपूरकरांची व्यथा मांडली. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनमुळे (CSTPS) निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवर त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधून तातडीने कारवाईची मागणी केली.
प्रदूषणाची भीषणता आणि आरोग्याचा प्रश्न
खासदार धानोरकर यांनी सभागृहात ठामपणे सांगितले की, या प्रकल्पातील जुन्या वीज संचांमुळे होणारे हवेचे प्रदूषण आता मर्यादेच्या पलीकडे गेले आहे. याचे गंभीर परिणाम स्थानिक नागरिकांना भोगावे लागत आहेत:
* आरोग्यावर घाला: लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार जडत आहेत.
* शेतीचे नुकसान: संचांमधून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे परिसरातील सुपीक शेती आता नापीक होत चालली आहे.
* कालबाह्य तंत्रज्ञान: अनेक वीज संच आपली विहित मुदत संपवूनही अद्याप कार्यरत असल्याने पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख मागण्या:
उच्चस्तरीय पर्यावरणीय ऑडिट: संपूर्ण प्रकल्पाचे तातडीने एका उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीमार्फत ‘एनवायरमेंटल ऑडिट’ करण्यात यावे.
प्रदूषणकारी संच बंद करा: जे वीज संच प्रदूषण नियंत्रण मानकांचे (Emission Norms) उल्लंघन करत आहेत, ते टप्प्याटप्प्याने बंद करण्यात यावेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: जुन्या संचांच्या जागी ‘आधुनिक आणि प्रदूषणमुक्त संच’ बसवण्यात यावेत.
> “चंद्रपूरने देशाला आणि राज्याला वीज दिली, आता केंद्र सरकारने चंद्रपूरच्या जनतेला शुद्ध हवा मिळवून द्यावी,” असा कडक इशारा देत खासदार धानोरकर यांनी या प्रलंबित प्रश्नावर त्वरित सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे.

🙏जय विदर्भ 🙏