Home Breaking News वन्यजीव मृत्यू रोखण्यासाठी NH 930 वर ‘वन्यजीव ओव्हरपास’ उभारा; खासदार प्रतिभा धानोरकर...

वन्यजीव मृत्यू रोखण्यासाठी NH 930 वर ‘वन्यजीव ओव्हरपास’ उभारा; खासदार प्रतिभा धानोरकर यांची नितीन गडकरींकडे आग्रही मागणी

चंद्रपूर :- अभिषेक किशोर भागडे
चंद्रपूर-मूल या संवेदनशील वन्यजीव कॉरिडॉरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ९३० (NH 930) वर वन्यजीवांचे वाढते अपघात रोखण्यासाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. या महामार्गावर तातडीने ‘वन्यजीव ओव्हरपास’ (Wildlife Overpass) मंजूर करण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली.
वाढती वाहतूक आणि वन्यजीवांचा जीव धोक्यात
चंद्रपूर जिल्हा हा व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखला जातो. मात्र, NH 930 वरून होणारी कोळसा आणि सिमेंटची जड वाहतूक वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. वाहनांच्या अतिवेगवान गतीमुळे वाघ, बिबट्या, अस्वल आणि इतर दुर्मिळ वन्यजीवांचा नाहक बळी जात आहे. ही परिस्थिती केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर वाहनधारकांच्या सुरक्षेसाठीही अत्यंत धोकादायक बनली असल्याचे खासदार धानोरकर यांनी निदर्शनास आणून दिले.
‘पेन्च मॉडेल’चा दिला दाखला
नागपूर-पेन्च राष्ट्रीय महामार्गावर (NH-7) ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वन्यजीव ओव्हरपास तयार करण्यात आले आहेत, त्याच धर्तीवर NH 930 वरील संवेदनशील पट्ट्यांमध्ये ‘ओव्हरपास’ निर्माण करावेत, अशी मागणी त्यांनी केली. “विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समन्वय साधणे ही काळाची गरज आहे. केवळ तात्पुरते उपाय या गंभीर समस्येवर तोडगा ठरू शकत नाहीत,” असे खडे बोल त्यांनी यावेळी सुनावले.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख मागण्या:
* पेन्च मॉडेलची अंमलबजावणी: ज्या भागात वन्यजीवांचा वावर अधिक आहे, तिथे तातडीने ओव्हरपास बांधावेत.
* मंत्रालयांचा समन्वय: रस्ते वाहतूक मंत्रालयाने पर्यावरण व वन मंत्रालयाशी समन्वय साधून राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळवावी.
* निधीची उपलब्धता: या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र सरकारने तातडीने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.
मानव-वन्यजीव संघर्ष कमी होणार
अभियांत्रिकी दृष्टिकोनातून सक्षम असलेल्या या उपाययोजनेमुळे भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मोठी मदत होईल. तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा नैसर्गिक वारसा सुरक्षित राहील, असा विश्वास खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केला आहे. आता या मागणीवर केंद्र सरकार काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहत राहा: ‘स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल’वरोरा

🙏जय विदर्भ 🙏