चंद्रपूर : – ‘Vuenow Marketing Services Limited’ या कंपनीद्वारे तब्बल ३७१७ कोटी ३० लाख ८२ हजार ९४७ रुपयांची आर्थिक उलाढाल करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचा मुख्य संचालक सुखवेदरसिंग हकमसिंग खरौर याला चंद्रपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
सदर कंपनीच्या संचालकांनी इंटरनेट डिव्हाइस डेटा सेंटरमधील ‘Cloud Particle’ खरेदी व भाड्याने देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांशी करार केले होते. मात्र, कालांतराने ही गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक असल्याचे समोर आले. याप्रकरणी रामनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाची आकडेवारी आणि कारवाई:
* एकूण उलाढाल: आरोपीने १४ वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे ३७१७ कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केली.
* बँक खाते गोठवले: या कारवाई दरम्यान कंपनीचे आयसीआयसीआय (ICICI) बँकेतील २८ कोटी ९९ लाख ११ हजार ३४९ रुपये पोलिसांनी गोठवले आहेत.
* अटक: मुख्य संचालक सुखवेदरसिंग खरौर (रा. मोहाली, पंजाब) याला ११ मार्च २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांना आवाहन:
ज्या नागरिकांनी ‘Vuenow Marketing Services Limited’ मध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांनी आपली ठेव परत मिळवण्यासाठी आवश्यक वैध कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे जाऊन विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शेगांवकर व त्यांच्या पथकाने केली आहे.
🙏जय विदर्भ 🙏




