Home विदर्भ आरमोरी मार्गावर अवजड ट्रकची C-60 जवानांच्या बुलेटप्रूफ वाहनाला धडक; जवानांचा जीव थोडक्यात...

आरमोरी मार्गावर अवजड ट्रकची C-60 जवानांच्या बुलेटप्रूफ वाहनाला धडक; जवानांचा जीव थोडक्यात बचावले जड वाहतुकीवर तात्काळ उपाययोजना करा – जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे

 

गडचिरोली :- आरमोरीच्या दिशेने जात असलेल्या एका अवजड ट्रकने C-60 पथकाच्या बुलेटप्रूफ वाहनाला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. सुदैवाने या अपघातात वाहनातील जवानांचा जीव थोडक्यात बचावला असून मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली.

गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी C-60 पथकातील जवान सतत जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात. मात्र अलीकडील काळात रस्त्यांवर वाढलेल्या अवजड वाहनांच्या प्रचंड वर्दळीमुळे जवानांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात खनिज, लाकूड तसेच इतर मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रकची वाहतूक सुरू आहे. अनेक ठिकाणी अरुंद रस्ते, वेगमर्यादेचे पालन न करणे तसेच वाहतुकीवरील अपुरे नियंत्रण यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. परिणामी केवळ जवानच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही सतत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जड वाहतुकीवर तात्काळ नियंत्रण ठेवावे, वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणावी तसेच संवेदनशील भागांमध्ये वाहतुकीसाठी विशेष नियम लागू करावेत, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे. जवानांच्या सुरक्षेसाठी रस्ते सुरक्षितता उपाययोजना आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.या वेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारेविपुल येलटीवार उपस्थित होते.

🙏जय विदर्भ.🙏