वरोरा : वरोरा-भद्रावती क्षेत्राचे लोकप्रिय आमदार व युवा नेते करणदादा देवतळे यांनी आपल्या मतदारसंघातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा आणि युवक-युवतींना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आज विधानसभेच्या सभागृहात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मतदारसंघात उपलब्ध जागेवर अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करावी, अशी ठाम मागणी माननीय अध्यक्ष महोदयांकडे करण्यात आली.
यावेळी बोलताना सांगण्यात आले की, वरोरा मतदारसंघात अनेक गुणी आणि होतकरू खेळाडू आहेत; मात्र योग्य सुविधा आणि प्रशिक्षण केंद्रांच्या अभावामुळे त्यांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे मतदारसंघात क्रीडा संकुल उभारल्यास युवक-युवतींना विविध क्रीडा प्रकारांसाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होईल.
ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार मैदान, प्रशिक्षण आणि स्पर्धांचे वातावरण मिळाल्यास भविष्यात राज्य व राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट खेळाडू घडू शकतात. त्यामुळे क्रीडा संकुलासाठी निधी मंजूर करून या भागातील क्रीडा चळवळीला चालना देणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्याकरिता वरोरा शहराचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष पवार यांनी पाठपुरावा करून क्रीडा क्षेत्रात अधिक तरुणांना याचा लाभ घेता येईल असा आग्रह धरून आमदार साहेबांच्या मार्फत या निधीचा योग्य व पारदर्शक वापर करून वरोरा परिसरात क्रीडा संस्कृती अधिक बळकट व्हावी आणि येथील तरुणांनी क्रीडा क्षेत्रात मोठे यश संपादन करावे, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली.
🙏जय विदर्भ🙏




