Home जिल्हा स्त्री शिक्षणाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना वरोऱ्यात अभिवादन

स्त्री शिक्षणाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना वरोऱ्यात अभिवादन

 

वरोरा : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजातील अज्ञान आणि अंधकार दूर करणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज ज्योतिबा फुले चौक, वरोरा येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना महात्मा ज्योतिबा फुले प्रभागाचे लोकप्रिय व युवा नगरसेवक तथा भाजप गटनेते अक्षय भिवदारे यांनी सांगितले की, सावित्रीमाईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असंख्य हालअपेष्टा सहन करत महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. आज महिला सन्मानाने आणि स्वाभिमानाने समाजात उभ्या राहत आहेत, त्यामागे सावित्रीमाईंनी घातलेला भक्कम पाया आहे. त्यांच्या कार्यामुळेच समाजात समता, शिक्षण आणि प्रगतीचा मार्ग खुला झाला.

सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सावित्रीमाई फुले यांनी केलेले अतुलनीय कार्य आजही समाजाला सामाजिक समतेसाठी आणि प्रगतीसाठी प्रेरणा देत आहे. त्यांच्या विचारांवर चालत समाजाने स्त्री शिक्षणाला अधिक बळ देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये संजय नरोले, विलास दारापूरकर अभिजित मारोडकर, मारोतराव मांडवगडे, सागर कपाटे, अनुप करडे, प्रथमेश पोटे, ऋषभ इंगळे, अथर्व धाबे, कपिल खडके, वेदांत खडके, ओंकार खडके, अनुप मांडवगडे, देवा बुरबंधे, प्रेम राऊत आदींचा समावेश होता.

समाजाने सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण, समता आणि स्त्री सन्मानाचा दीप सतत प्रज्वलित ठेवण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

🙏जय विदर्भ🙏