Home Breaking News रेती घाटावरील रक्तरंजित संघर्ष : बामर्डा खून प्रकरणात वाळू माफियावर मकोका

रेती घाटावरील रक्तरंजित संघर्ष : बामर्डा खून प्रकरणात वाळू माफियावर मकोका

रेती घाटावरील रक्तरंजित संघर्ष : बामर्डा खून प्रकरणात वाळू माफियावर मकोका

संघटित टोळीने केला जीवघेणा हल्ला; १२ आरोपींना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील बामर्डा रेती घाटावर पैशांच्या वादातून घडलेल्या खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत वाळू माफियांच्या संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत १२ आरोपींना अटक करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

पोलीस ठाणे वरोरा येथे १ मार्च २०२६ रोजी फिर्यादी पंकज वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बामर्डा रेती घाटावर पैशांच्या वादातून आरोपींनी पोकलॅन यंत्र आडवे लावून घाटातून बाहेर जाण्याचा मार्ग बंद केला. त्यानंतर तलवारी व लाकडी दांड्यांनी सुसज्ज होऊन आरोपींनी भरत दयानंद नागपाल यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाण करून तलवारीने वार केले व नदीतील खोल पाण्यात फेकून दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना मारहाण करून वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि डिझेल टाकून गाड्या जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

या तक्रारीवरून पोलीस ठाणे वरोरा येथे गुन्हा क्रमांक ३७४/२०२६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अमोल रामचंद्र कामडी (वय ३६, रा. झाडे लेआउट सालोड), सौरभ दिलीपसिंग (वय ३६, रा. रामनगर वर्धा), अक्षय विजयराव खडसे (वय २८, रा. हिंदनगर वर्धा), उदय भास्कर वांदीले (वय २४, रा. सालोड-हिरापूर), नितीन यशवंत कामडी (वय २५, रा. सालोड), अजय उर्फ गोलू दिपसिंग इरपाचे (वय ३०, रा. गुदमा, जि. शिवणी, मध्यप्रदेश), प्रकाश शंकर कासारे (वय ४७, रा. कापसी), प्रवीण कवडुजी वासेकर (वय ४७, रा. कापसी), गितेश वसंतराव सातपुते (वय ३७, रा. सावरकर नगर भद्रावती), प्रफुल सूर्यभान उमाटे (वय ४२, रा. गांधी नगर वर्धा), सुनील नारायणराव झोरे (वय ३७, रा. सावंगी मेघे वर्धा) व अतुल पुरुषोत्तम मोटघरे (वय ४७, रा. त्रिमूर्ती नगर उमरी, वर्धा) यांना अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान या आरोपींनी संघटित टोळी तयार करून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, अवैध वाळू चोरी व वाहतूक, अवैध दारू विक्री, जुगार तसेच इतर गंभीर गुन्हे केल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (मकोका) अंतर्गत कलम ३(१), ३(२), ३(३) व ३(४) अन्वये प्रस्ताव तयार करून नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के (पोलीस ठाणे वरोरा), पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा) तसेच पोलीस पथकाने केली.

जय विदर्भ