चंद्रपूर : शहरातील प्राचीन व ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा, अशी मागणी आमदार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सविस्तर पत्र पाठवून मंदिराच्या ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, चंद्रपूर शहराला सुमारे ८०० वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड राजवटीपासून भोसलेकालीन परंपरेपर्यंत शहराने सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. किल्ले, प्राचीन वास्तू आणि विविध देवस्थाने ही शहराची ओळख बनली आहेत. माता महाकाली, श्री अंचलेश्वर आणि भगवान श्री विठ्ठल ही शहराची आराध्य दैवते मानली जातात.
चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर हे अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक देवस्थान असून, अनेक दशकांपासून ते भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. मंदिर परिसरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन आणि उत्सवांचे आयोजन केले जाते.
दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरातून भव्य रथयात्रा काढली जाते. हा रथ संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करतो. या वेळी हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. शहरातील विविध भागांतील नागरिक, महिला मंडळे तसेच वारकरी संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. ‘विठू नामाचा गजर’ करत भक्तिमय वातावरणात ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. त्यामुळे ही रथयात्रा शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असल्याने उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांची आवश्यकता भासते. मंदिरास ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यास शासन स्तरावरून आर्थिक व प्रशासकीय सहाय्य उपलब्ध होऊन या सुविधा अधिक सक्षमपणे पुरवता येतील, असे आ. मुनगंटीवार यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. हे मंदिर चंद्रपूरकरांच्या भावनांचा अमूल्य ठेवा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाच्या नियमानुसार ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात यावा, यासाठी चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीने आ. मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार ठरावही पारित केला आहे.




