Home महाराष्ट्र ⭕🙏 वसईच्या आयुष मात्रेच्या नेतृत्वाखाली भारत अंडर 19 विश्वविजेता! 🙏⭕

⭕🙏 वसईच्या आयुष मात्रेच्या नेतृत्वाखाली भारत अंडर 19 विश्वविजेता! 🙏⭕

वसईच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारत अंडर-१९ विश्वविजेता!
वसई–विरारच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णअध्याय

वसई  :
वसईतील आयुष म्हात्रे या होतकरू तरुणाच्या प्रभावी नेतृत्वाखाली भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकत देशाच्या क्रिकेट इतिहासात आणखी एक उज्वल पान जोडले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

आयुषच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या विजयामुळे नालासोपारा, वसई आणि विरारच्या क्रिकेट इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. कॅरी पॅकर्सने रंगीत कपड्यातील क्रिकेट सुरू केल्यानंतर जसे क्रिकेटचे स्वरूप बदलले, तसेच आयुषसारख्या खेळाडूंमुळे आज छोट्या शहरांचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट नकाशावर ठळकपणे उमटत आहे. वर्ल्डटेलचे मार्क मस्करन्हस यांनी क्रिकेटमध्ये आणलेली व्यावसायिकता, सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक करार आणि पुढे आयपीएलमुळे खुललेले नवे दालन — या प्रवासात आयुष म्हात्रे हे नाव आता अभिमानाने घेतले जात आहे.

जसे एम. एस. धोनीने झारखंडमधील रांचीला आंतरराष्ट्रीय ओळख दिली, तसेच आयुषने आपल्या कर्तृत्वाने वसई–विरारचे नाव जागतिक क्रिकेट पटलावर अधोरेखित केले आहे. त्याच्या यशामुळे येथील भूमिपुत्रांची छाती अभिमानाने फुलली आहे.

विरार फास्ट लोकल जशी रोज उशिरा येण्याच्या कारणांसाठी ओळखली जाते, तशीच आयुषची आयपीएलमधील वाटचाल मात्र कुठेही न अडखळता सरळ आणि वेगवान ठरली. त्याने खेळलेल्या इनिंग्ज या खऱ्या अर्थाने क्रिकेटरसिकांच्या नजरेला सुखावणाऱ्या होत्या. गगनचुंबी षटकारांसोबतच सीमापार जाणारे देखणे ड्राईव्ह — आयुषकडे उत्तुंग फटके आणि क्लासिकल ड्राईव्ह यांचा अक्षय भाता असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

म्हात्रे या आडनावाचा अर्थच ‘महत्तर’ — नेतृत्व करणारे, निर्णय घेणारे. त्या अर्थाला साजेसा न्याय आयुषने आपल्या खेळातून आणि नेतृत्वातून दिला आहे. त्याच्यातील गुणांची दखल घेऊन भारतीय निवड समितीने त्याच्यावर अंडर-१९ संघाचे कर्णधारपद सोपवले आणि आयुषने या संधीचे सोने करत भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले.

“ये तो झाकी है…” असे म्हणावे लागेल. भविष्यात आयुष म्हात्रेला वरिष्ठ भारतीय संघाचे नेतृत्व करताना पाहण्याचे स्वप्न आज अनेक क्रिकेटप्रेमी पाहत आहेत. स्वप्न पाहणे भारतीयांच्या रक्तातच आहे; आणि आयुष म्हात्रे ही स्वप्ने केवळ दाखवत नाही, तर ती सत्यात उतरवत आहे.

🙏जय विदर्भ🙏

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.

☎️ 9673574711

☎️8329889732