**वरोऱ्यात स्वच्छतेला बळ!
नवी शौचालये व नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्तीसाठी मनीष जेठानी यांचा ठोस पुढाकार**
नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सार्वजनिक बांधकाम समिती सभापतींची निर्णायक भूमिका
वरोरा :- अभिषेक किशोरराव भागडे
वरोरा शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदृष्ट्या अनुकूल वातावरण मिळावे, यासाठी नगर परिषद सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती मनीष मुरली जेठानी यांनी पुढाकार घेत नवीन शौचालय उभारणी व नादुरुस्त शौचालयांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी आज, २ फेब्रुवारी रोजी, संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले.
नगर परिषद वरोरा येथील मुख्याधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांना स्वतंत्र पत्राद्वारे देण्यात आलेल्या निवेदनात, शहरातील महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांच्या गैरसोयी दूर करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.
यामध्ये आनंदवन चौक व रत्नमाला चौक येथे नवीन सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करण्यात यावे, तसेच गांधी चौकातील पुरुष मुतारी आणि वीर सावरकर चौकाजवळील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या नादुरुस्त शौचालयांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील गर्दीच्या परिसरात शौचालयांची तीव्र कमतरता असून, याचा सर्वाधिक फटका महिला, ज्येष्ठ नागरिक व बाहेरून येणाऱ्या नागरिकांना बसत असल्याचे जेठानी यांनी निदर्शनास आणून दिले. स्वच्छता ही आरोग्याची पहिली पायरी असून, या कामांकडे गांभीर्याने पाहून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
याशिवाय, उपविभागीय कार्यालय, वरोरा परिसरात शौचालय व मुतारीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातून विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करत, त्या ठिकाणीही नवीन शौचालय व मुतारी उभारणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
याबाबत बोलताना मनीष जेठानी यांनी सांगितले की,
“नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होणार नाही. स्वच्छ, सुसज्ज व आरोग्यदायी वरोरा घडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम समिती कटिबद्ध आहे.”
या पुढाकारामुळे वरोरा शहरातील स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सुविधांमध्ये लवकरच सकारात्मक बदल घडेल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
🙏🏻जय विदर्भ 🙏🏻
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️ 8329889732




