🚨 भद्रावती बसस्थानक परिसरात तातडीने पोलीस मदत केंद्राची गरज
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांची जोरदार मागणी
भद्रावती / प्रतिनिधी
चंद्रपूर–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भद्रावती शहरातील बसस्थानक परिसर सायंकाळनंतर असुरक्षित बनत चालला असून, प्रवाशांच्या विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे सूर्यास्तापासून शेवटची बस सुटेपर्यंत पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक व प्रवाशांकडून होत आहे.
महाराष्ट्रातील एक महत्वाचे औद्योगिक व पर्यटन शहर म्हणून ओळख असलेल्या भद्रावतीत आयुध निर्माणी कारखाना, कोळसा खाणी, तसेच भद्रनाग स्वामी मंदिर, गौराळा वरद विनायक, जैन मंदिर, भवानी मंदिर यांसारखी सर्वधर्मीय श्रद्धास्थाने आहेत. शासनाने या शहराला पर्यटन नगरीचा दर्जा दिल्याने दररोज हजारो प्रवासी, भाविक व पर्यटक बसस्थानकावर ये-जा करतात.
शहराशी जोडलेली असंख्य ग्रामीण गावे, शाळकरी विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला, युवती यांना सायंकाळी बसस्थानकात बराच वेळ बसची वाट पाहावी लागते. मात्र याच वेळेत बसस्थानक परिसर व महामार्गालगत असलेल्या वाईन बारमधून बाहेर पडलेले मद्यधुंद मद्यपी खुलेआम वावरताना दिसतात.
दारूच्या नशेत हे मद्यपी वाचाळपणा करतात, महिलांकडे टिंगलटवाळी करतात, प्रवाशांना मानसिक त्रास देतात. महिलांसाठी ही परिस्थिती डोकेदुखी ठरत असून, त्रास सहन करावा लागतोय, पण बोलण्याचीही भीती निर्माण झाली आहे. एकीकडे प्रवासी घराकडे निघण्याच्या घाईत मुकाट सहन करत आहेत, तर दुसरीकडे मद्यपी मोकाट सुटलेले दिसतात—ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
👉 प्रवाशांची सुरक्षितता अबाधित ठेवायची असेल, तर भद्रावती बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी किंवा सायंकाळी कार्यरत पोलीस मदत केंद्र सुरू करणे अत्यावश्यक आहे.
👉 पोलिसांचा वावर वाढल्यास मद्यपींवर वचक बसेल आणि महिलांना दिलासा मिळेल, अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे.
आता प्रश्न हा आहे— एखादी गंभीर घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का?
की वेळेत पावले उचलून प्रवाशांना सुरक्षिततेची हमी देणार?
🙏 जय विदर्भ 🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
📞 9673574711
📞 8329889732




