अकोला येथील बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना व्यवहारी ज्ञानाची खरी कमाई
वरोरा : – अरुन उमरे ( अकोला नं. 1 )
तालुक्यातील अकोला नं. १ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्या अंतर्गत “खरी कमाई” या उपक्रमाने विद्यार्थ्यांना व्यवहारिक शिक्षणाचा अनोखा अनुभव दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विक्री, खरेदी, नफा-तोटा आणि ग्राहकांशी संवाद यांचे धडे गिरवले. शाळेच्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल उभारले होते. यात अनुराधा उमरेचा कच्चा चिवडा, प्रियांश उमरेचे पिंगर व भजे, आस्था आत्रामचा कडक चहा, अंश आत्रामचा आलूपोहा, माही मरापेचे रसभरीत गुलाबजामून, तन्वीश रंदईचे लाडू आणि अंश सावसाकडेची कुरकुरीत चकली यांचा समावेश होता. चविष्ट पदार्थांमुळे ग्राहकांची मोठी गर्दी झाली आणि अवघ्या काही तासांत बहुतांश स्टॉलवरील पदार्थ संपले. कडक चहाच्या स्टॉलने मात्र शेवटपर्यंत जोरदार प्रतिसाद मिळवला.
कमाईच्या बाबतीत कुरकुरीत चकलीने सर्वाधिक बाजी मारली, तर कच्चा चिवडा दुसऱ्या क्रमांकावर राहिला. इतर सर्व स्टॉलधारक विद्यार्थ्यांनीही समाधानकारक नफा मिळवला. विशेष म्हणजे कोणाचाही स्टॉल तोट्यात गेला नाही आणि सर्वांनी ५० ते ६० टक्क्यांपेक्षा अधिक नफा कमावत व्यवहाराचे प्रत्यक्ष धडे घेतले.
या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे विठ्ठल उमरे, अनिता मरापे, कल्याणी रंदई, पांडुरंग उमरे, अनिल सावसाकडे, स्मिता आत्राम, प्रणाली उमरे, कलावती भुते, अल्का धुर्वे, अरुण उमरे, प्रवीण आत्राम, प्रमोद रंदई, माया उमरे, अल्का भोगेकर, स्वाती सावसाकडे, नूतन सातपुते, महेश मरापे यांच्यासह शिक्षक, पालक, अंगणवाडी कर्मचारी, युवक मंडळी, महिलावर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, नियोजन आणि आर्थिक शिस्त रुजवणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला. शाळेच्या या अभिनव प्रयोगामुळे शिक्षण अधिक जिवंत आणि अनुभवाधारित बनल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
🙏 जय विदर्भ🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️ 8329889732




