उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणूक कार्यक्रमात बदल; ७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला मतमोजणी
वरोरा :-✍️ अभिषेक किशोरराव भागडे
राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक यंत्रणेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ७ फेब्रुवारीला होणारी मतमोजणी पुढे ढकलून ती ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.
या बदलानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार मतदान ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल.
जाहीर प्रचाराची मुदतही बदलण्यात आली असून ती आता ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता संपणार आहे. मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता आपोआप संपुष्टात येईल.
दरम्यान, निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या बदलामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी उमेदवार व यंत्रणेला नव्या वेळापत्रकानुसार तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🙏🏻जय विदर्भ 🙏🏻
बातमी व जाहिराती करीता संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732




