शासकीय आश्रम शाळा लाहेरी येथे ५० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा
सरकारी जेवणाने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
जेवणानंतर उलट्यांचा पाऊस; प्रशासन झोपेतच, पालक संतप्त
भामरागड : अभिषेक भागडे
शासन विद्यार्थ्यांच्या पोषणाबाबत मोठमोठे दावे करत असताना, प्रत्यक्षात मात्र शासकीय आश्रम शाळांमधील ढिसाळ व निष्काळजी अन्नव्यवस्थेचा बळी चिमुकले विद्यार्थी ठरत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. तालुका मुख्यालयापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय, लाहेरी येथे आज सकाळी तब्बल ५० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची गंभीर व धक्कादायक घटना घडली आहे.
शाळेतील सकाळच्या जेवणानंतर सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास प्रार्थना व परिपाठ सुरू असताना एका विद्यार्थ्याला अचानक उलटीचा तीव्र त्रास सुरू झाला. सुरुवातीला याकडे किरकोळ म्हणून दुर्लक्ष करण्यात आले; मात्र काही मिनिटांतच अनेक विद्यार्थ्यांना उलट्या, चक्कर येणे व अशक्तपणाची लक्षणे दिसू लागली. पाहता पाहता परिस्थिती हाताबाहेर गेली आणि शाळेच्या आवारात एकच गोंधळ उडाला.
अखेर तब्बल ५० हून अधिक विद्यार्थ्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी व त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे हलविण्यात आले. विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू असले तरी, या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. “विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का?” असा संतप्त सवाल पालकांकडून केला जात आहे.
या प्रकारासाठी जबाबदार कोण?
अन्न शिजवताना स्वच्छतेचे निकष पाळले गेले का?
अन्नाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?
हे सर्व प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
घटनेची माहिती मिळूनही संबंधित यंत्रणा उशिराने हलल्याचा आरोप होत असून, केवळ चौकशीचे फार्स न करता दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी होत आहे. आश्रम शाळांमधील भोजन व्यवस्थेचा ठेका घेणाऱ्यांपासून ते संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य हे शासनासाठी केवळ आकड्यांपुरतेच मर्यादित आहे का?
की पुन्हा एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार?
हा प्रश्न आता संपूर्ण भामरागड तालुक्यात घुमत आहे.
🙏🏻 जय विदर्भ 🙏🏻
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️8329889732
☎️9673574711




