वरोरा :- अभिषेक भागडे
वरोरा तालुक्यातील गट ग्रामपंचायत कोंढाळा (येन्सा) येथे २७ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले.
गावात उभारण्यात येणाऱ्या नवीन सिमेंट प्रकल्पाला दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्राबाबत ग्रामस्थांनी ठाम विरोध व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या मते, २१ मे २०२५ रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सरपंच आणि काही सदस्यांनी संगनमत करून श्री सिमेंट कंपनीला नाहरकत (एनओसी ) दिली होती, मात्र त्यावेळी गावकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते. त्यामुळे ही कारवाई पारदर्शक नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
गावातील लोकांना रोजगाराची हमी, प्रकल्पामुळे ग्रासले जाणारे भूखंड, त्यांचा मोबदला आणि सुविधा याबाबत ठोस हमीशिवाय एन.ओ.सी. देणे चुकीचे आहे, असे ग्रामस्थांचे मत या सभेत मांडण्यात आले.
२७ जानेवारी रोजी झालेल्या या ग्रामसभेला विस्तार अधिकारी (पंचायत) राजेंद्र भानुसे, सचिव प्रभाकर पोटे, सरपंच रवींद्र भोयर, उपसरपंच सुरेखा लभाने, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या ग्रामसभेत महिलांची लक्षणीय उपस्थिती विशेषत्वाने जाणवली.
दीर्घ चर्चेनंतर अखेर २१ मे २०२५ रोजी श्री सिमेंट कंपनीला देण्यात आलेली एन.ओ.सी. सर्वानुमते रद्द करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला की, जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या स्थानिकांना रोजगार, योग्य मोबदला, सुविधा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कंपनीचे काम बंद ठेवण्यात यावे.
या निर्णयामुळे कोंढाळा (येन्सा) परिसरात ग्रामस्थांचा आत्मविश्वास वाढला असून, ग्रामसभेचा हा ठराव पुढील स्थानिक विकास आणि औद्योगिक निर्णयांवर महत्त्वपूर्ण परिणाम घडवू शकतो.
🙏जय विदर्भ 🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️ 8329889732




