नवी दिल्ली :-देशाच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘जनगणना २०२७’ प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याची केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केली आहे. १ एप्रिल २०२६ पासून या महत्त्वाकांक्षी मोहिमेला सुरुवात होणार असून, पहिल्या टप्प्यात ‘घरयादी’ आणि ‘गृहगणना’ करण्यात येणार आहे.
या टप्प्यासाठी सरकारकडून ३३ प्रश्नांची अधिकृत यादी अधिसूचित करण्यात आली आहे. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशाला १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत आपल्या सोयीनुसार ३० दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
नियुक्त प्रगणक घराघरात जाऊन घराची मालकी, घराचा वापर, तसेच घराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य (छप्पर, मजला आदी) यांची सविस्तर माहिती नोंदवतील. पुढील टप्प्यांतील संपर्कासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांकही नोंदवला जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे, प्रत्यक्ष प्रगणक घरी येण्याच्या १५ दिवस आधी नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ही गृहगणना सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे.
देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक नियोजनाचा पाया असलेली ही जनगणना नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे अधिक अचूक आणि प्रभावी ठरणार आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा :
☎️ 967357471
☎️ 8329889732




