ती आई अनोळखी होती… पण पोलिसांनी तिला आईसारखाच निरोप दिला
गडचिरोलीत माणुसकी जिवंत असल्याचा सुन्न करणारा अनुभव
गडचिरोली: ✍️ { अभिषेक भागडे, वरोरा }
पोलीस म्हणजे फक्त गणवेश, काठी आणि कायदा नाही. पोलीस म्हणजे प्रसंगी आईच्या मायेने कवटाळणारा, कुणाचाही नसलेला आधार बनणारा माणूस असतो… आणि हेच गडचिरोली पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.
आठ दिवसांपूर्वी रात्रीचा काळोख दाटलेला असतानाच गडचिरोली पोलीस ठाण्यात एक फोन वाजला.
“साहेब… बसस्थानकात एक वृद्ध महिला आणून सोडली आहे. ती उठूही शकत नाही.”
क्षणाचाही विचार न करता पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आपल्या सहकाऱ्यांसह धावले. बसस्थानकाच्या थंड फरशीवर पडलेली ती वृद्ध महिला… थकलेलं शरीर, सुन्न डोळे, ओठांवर शब्द नाहीत… आणि सभोवती अपार एकटेपण.
क्षणभर थांबून पाहण्याचा प्रश्नच नव्हता. तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू झाले. तिचा जीव वाचावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले. आणि सोबतच सुरू झाला तिच्या नात्यांचा शोध…
पण जिथे नातं असायला हवं होतं, तिथे फक्त निर्दय नकार मिळाला.
“आम्ही तिला ओळखत नाही.”
तेव्हा मनात एकच प्रश्न घोळत राहिला —
जन्म देणाऱ्या आईला आपण इतकं एकटं कसं सोडू शकतो?
ज्या झाडाच्या सावलीत आपण मोठे झालो, ते झाड म्हातारं झाल्यावर तोडून टाकायचं असतं का?
चव्हाण साहेबांनी वृद्धाश्रम, सामाजिक संस्था, सर्वत्र संपर्क केला. पण ती महिला फारच अशक्त होती. हातपाय हालत नव्हते. कुणीही जबाबदारी घ्यायला पुढे आलं नाही. अखेर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी तिची सेवा सुरू ठेवली.
चार-पाच दिवसांनी तो फोन आला…
“साहेब… त्या महिलेचं निधन झालं आहे.”
पोलिसांनी पुन्हा नातेवाईकांना फोन केला. कदाचित आता तरी कोणी येईल, असा शेवटचा आशेचा किरण…
पण उत्तर आलं —
“आम्ही येणार नाही. तुम्हीच पाहून घ्या.”
त्या क्षणी ती आई खरंच एकटी पडली…
ना कुणाचं रक्ताचं नातं,
ना कुणाची हाक,
ना कुणाचा खांदा.
पण नियतीने तिच्यासाठी वेगळाच आधार निवडला होता.
पोलीस दादा आणि नगरपरिषदेचे कर्मचारी.
कर्तव्याच्या पलीकडे जाऊन, माणुसकीची कास धरत, त्यांनी त्या अनोळखी मातेला शेवटचा खांदा दिला. विधीवत अंत्यसंस्कार केले. तिच्या चितेला अग्नी देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते… कारण ती कोणाची आई नव्हती, ती सर्वांची आई होती.
या अंतिम प्रवासात पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस कर्मचारी योगेश कोरवते, अजय कोल्हे, गडचिरोली नगरपरिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पीदुरकर, वैभव कागदेलवार, राजू मधुमटके, स्वप्निल निमगडे, तसेच मोरेश्वर मडावी, किशोर पोहनकर, किशोर मुनघाटे, सुखीराम मेश्राम, लोमेश देशमुख यांनी माणुसकीचं कर्तव्य निभावलं.
ही बातमी वाचून डोळे पाणावतात…
आणि मनात आशा जागी होते —
आजही समाजात माणुसकी शिल्लक आहे.
ती पोलिसांच्या गणवेशात उभी आहे… शांत, नम्र आणि कर्तव्यनिष्ठ.
🙏 सलाम गडचिरोली पोलिसांना…
सलाम त्या अनोळखी आईला…
आणि सलाम माणुसकीला. 🙏
—🙏जय विदर्भ 🙏—बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️ 9673574711☎️ 8329889732




