⭕🙏⭕चंद्रपूरची आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल खेळाडू कु.राखी दोरखंडे चे भव्य स्वागत आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार⭕🙏⭕

चंद्रपूरची आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू कु. सखी दोरखंडे हिचे भव्य स्वागत; आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार

चंद्रपूर | प्रतिनिधी ( अभिषेक भागडे )

चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला आहे. चंद्रपूर येथील पहिली आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू कु. सखी पांडुरंग दोरखंडे हिची सन २०२५ मध्ये चीन येथे आयोजित अंडर–१५ वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली होती. या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व करत देशाच्या नावलौकिकात मोलाची भर घातली.

या ऐतिहासिक यशाबद्दल तिच्या आगमनानिमित्त दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा स्टेडियम मित्र परिवाराच्या वतीने भव्य स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून काढण्यात आलेल्या या स्वागत रॅलीत क्रीडाप्रेमी, युवक, पालकवर्ग तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. फुलांचा वर्षाव, ढोल-ताशांचा गजर आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

या प्रसंगी लोकनेते, माननीय आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी उपस्थित राहून कु. सखी पांडुरंग दोरखंडे हिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला. यावेळी आमदार मुनगंटीवार म्हणाले की,
“कु. सखीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे व चंद्रपूरचे नाव उज्ज्वल केले असून, तिचे यश हे जिल्ह्यातील हजारो खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे. शासन व समाजाने अशा गुणवंत खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे.”

स्वागत रॅलीदरम्यान कु. सखी दोरखंडे हिच्यावर नागरिकांनी प्रेमाचा वर्षाव केला. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही ती आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी पदके जिंकून आणेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला क्रीडा प्रशिक्षक, जिल्हा स्टेडियम मित्र परिवाराचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

—🙏 जय विदर्भ 🙏—{ बातमी व जाहीराती करीता संपर्क साधा. ☎️9673574711 ☎️ 8329889732 }