विदर्भाच्या झुंझार नेत्याला अखेरचा निरोप…!
विदर्भ चळवळीचे आधारस्तंभ नानाभाऊ एंबडवार यांना कोंघारा येथे भावपूर्ण श्रद्धांजली
कोंघारा ( अभिषेक भागडे ) :
विदर्भ चळवळीचे झुंझार नेते, राज्याचे माजी वनमंत्री तथा कृषीमंत्री नानाभाऊ एंबडवार यांच्या पार्थिवावर आज कोंघारा येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने संपूर्ण विदर्भात हळहळ व्यक्त होत असून राजकीय, सामाजिक व शेतकरी वर्गात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
नानाभाऊ एंबडवार हे विदर्भाच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीपासून ते शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसाच्या प्रश्नांपर्यंत त्यांनी सातत्याने आवाज उठवला. वनमंत्री व कृषीमंत्री म्हणून काम करताना त्यांनी शेतकरी हित, जंगल संरक्षण आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांचे कार्य आणि स्पष्टवक्तेपणा हे विदर्भातील तरुण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
आज झालेल्या अंत्यसंस्कारप्रसंगी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वत्र शोककळा पसरली असून ‘नानाभाऊ अमर रहें’च्या घोषणांनी परिसर भारावून गेला होता. या दुःखद प्रसंगी अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नानाभाऊंना श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या जीवनकार्याचा गौरव केला.
यावेळी यवतमाळ–वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजयभाऊ देशमुख, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, तसेच दिपकभाऊ, आनंदभाऊ आणि रविभाऊ एंबडवार यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी नानाभाऊंच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
नानाभाऊ एंबडवार यांचे विदर्भासाठीचे योगदान, शेतकरी व सामान्य जनतेसाठी असलेले त्यांचे निस्वार्थ समर्पण हे कायम स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने विदर्भाच्या राजकारणात आणि सामाजिक चळवळीत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
नानाभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली!
परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि एंबडवार कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
— स्वतंत्र विदर्भ न्यूज, पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली —🙏
जय विदर्भ! 🙏—
(बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : ☎️ 9673574711 | ☎️ 8329889732)




