वरोरा : अभिषेक भागडे एडवोकेट 🙏आदेश जी आलोने यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आजचा विशेष लेख | ६ डिसेंबर – महापरिनिर्वाण दिन विशेष

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात अभिवादन; चैत्यभूमीवर लाखो अनुयायांची गर्दी

मुंबई/नवी दिल्ली – भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवाधिकारांचे जागतिक पुरस्कर्ते आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून कोट्यवधी अनुयायी आदरांजली अर्पण करत आहेत. चैत्यभूमी, मुंबई येथे आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली असून विविध राज्यांत स्मरणसभांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे.

दिल्लीतील निवासस्थानी ६ डिसेंबर १९५६ रोजी पहाटे त्यांचे महापरिनिर्वाण

५ डिसेंबर १९५६ च्या रात्री ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे परीक्षण करून झाल्यानंतर पहाटे १२.१५ वाजता बाबासाहेबांचे दिल्लीतील निवासस्थानी निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्षे व ७ महिने होते. विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले आणि ७ डिसेंबर रोजी बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबईतील सर्वात मोठी अंत्ययात्रा – १५ लाखांचा मानवी समुद्र

७ डिसेंबर १९५६ रोजी दादर येथील ‘राजगृह’मधून बाबासाहेबांची अंत्ययात्रा दुपारी १.४० वाजता निघाली. दादर–परळ–एलफिन्स्टन–रानडे रोड मार्गे यात्रेला दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमी (आताची चैत्यभूमी) येथे पोहोचण्यास तब्बल चार तास लागले.
या अंत्ययात्रेत देशभरातील सुमारे १५ लाख लोक सहभागी झाले होते. मुंबईच्या इतिहासातील ही सर्वात मोठी अंत्ययात्रा मानली जाते.

इतिहासातील अद्वितीय दीक्षा – १० लाख अनुयायांना पंचशील

दहनसंस्कारानंतर उपस्थित जनसमुदायाच्या आग्रहावरून त्या ठिकाणीच बौद्ध भिक्खू महामहापंडित डॉ. आनंद कौशल्यायन यांनी १० लाख लोकांना त्रिशरण पंचशील देऊन बौद्ध धर्मात दीक्षित केले. भारतातील बौद्ध धर्माचा हा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक क्षण ठरला.

पत्रकारिता: समाजजागृतीचे प्रभावी हत्यार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीला दिशा देण्यासाठी वृत्तपत्रे हे ताकदीचे माध्यम बनवले. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत ही त्यांची पाच महत्त्वाची वृत्तपत्रे समाजजागृतीची प्रभावी साधने ठरली. शाहू महाराजांच्या मदतीने सुरू झालेल्या ‘मूकनायक’पासून ते ‘प्रबुद्ध भारत’पर्यंत त्यांच्या लेखणीने अस्पृश्यांच्या प्रश्नांना नवी दिशा दिली.

आंतरराष्ट्रीय सन्मान – एल.एल.डी., डी.लिट्. आणि ‘बोधिसत्व’ उपाधी

१९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने तर १९५३ मध्ये उस्मानिया विद्यापीठाने त्यांनी केलेल्या सामाजिक, कायदेविषयक आणि मानवतावादी कार्यासाठी मानद पदव्या बहाल केल्या. १९५५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत त्यांना ‘बोधिसत्व’ ही उपाधी प्रदान करण्यात आली.

देशाचा सर्वोच्च सन्मान – मरणोत्तर भारतरत्न

१४ एप्रिल १९९० रोजी त्यांच्या जन्मशताब्दी दिनी भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान केला. हा पुरस्कार माईसाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला.

आंबेडकरांचे जागतिक वारसा

डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव भारतापुरता मर्यादित नसून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. हंगेरी, जपान, तैवान आदी देशांत त्यांच्या विचारांचा स्वतंत्र अभ्यास केला जातो. हंगेरीतील “डॉ. आंबेडकर हायस्कूल” ही त्यांचे नाव धारण करणारी पहिली आंतरराष्ट्रीय संस्था ठरली.

भारतीय समाजावर अमूल्य योगदान

जातिव्यवस्थेच्या उच्चाटनाला गती

अस्पृश्य, शोषित व वंचितांच्या हक्कांना घटनात्मक संरक्षण

बौद्ध धर्माचे भारतातील पुनरुज्जीवन

शिक्षण, आरक्षण, मानवाधिकार आणि लोकशाही मूल्यांना नवा पाया

 

अजरामर विचार – प्रेरणाचा अजोड स्रोत

महापरिनिर्वाणानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगभरातील शोषित-वंचितांच्या संघर्षाला दिशा देत आहेत. ‘आंबेडकरवाद’ आजही सामाजिक परिवर्तनाचा दृढ मार्गदर्शक ठरतो आहे.

—🙏 जय विदर्भ 🙏—( बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️ 8329889732 )