नीट परिक्षार्थींच्या फसवणूकीप्रकरणी सीबीआयकडून दोघांना अटक

CBI arrests two in NEET exam cheating case

मुंबई (Mumbai):- नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. आरोपींनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा दावा करून विश्वास संपादन करत होते, अशी माहिती सीबीआयने शनिवारी दिली. याप्रकरणी सीबीआय अधिक तपास करत आहे.

आरोपींनी अनेक विद्यार्थी व पालिकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेले आरोपीमध्ये संदीप शहा आणि सलीम पटेल यांचा समावेश असून त्यांना अनुक्रमे ९ आणि १० जून रोजी मुंबई आणि सागली येथून अटक करण्यात आली, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. सीबीआयने ९ जूनला याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींनी नीट युजी २०२५ परीक्षेतील कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून पालकांकडून मोठी रक्कम उकळली, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपींनी अनेक विद्यार्थी व पालकांना अधिकाऱ्यांच्या मदतीन गुण वाढवून देण्याचे आमीष दाखवले होते. त्या बदल्यात आरोपींनी मोठी रक्कम घेतल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. आरोपी पालकांवर प्रभाव टाकण्यासाठी परळ परिसरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये पालकांची भेट घ्यायचे.

संदीप शहा याने विद्यार्थ्यामागे प्रत्येकी तब्बल ९० लाख रुपये मागितले होते. मात्र, चर्चेनंतर ही रक्कम ८७ लाख ५० हजार रुपये स्वीकारण्यास होकार दिला होता. निकाल जाहीर होण्याच्या सहा तास आधी त्यांना वाढवलेल्या गुणांची माहिती मिळेल, असे आश्वासन दिले होते. या व्यवहारात संदीप शहा नियमितपणे नवी मुंबईतील शिक्षण सल्लागार संस्थेचे संचालक सलीम पटेल याच्या संपर्कात होता. तसेच पुण्यातील आणखी एका सल्लागार संस्थेशी देखील त्याचे संबंध होते, अशी माहिती सीबीआयकडून (CBI) देण्यात आली आहे.