ऑडी कार दुर्घटना प्रकरण : सुषमा अंधारे नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात

ऑडी कार दुर्घटना प्रकरण : सुषमा अंधारे नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात
Audi car accident case: Sushma Andhare in Nagpur's Sitabardi police station

नागपूर : नागपूरच्या रामदासपेठ परिसरात 8 सप्टेंबरला मध्यरात्री एका भरधाव गाडीने 5 ते 6 वाहनांना धडक दिली होती. या घटनेमध्ये महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचे नाव आल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही माहिती समोर येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. पोलिसांच्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट नागपूरमधील सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. यावेळी त्यांनी पोलिसांसमोर या प्रकरणासंबधित काही सवाल उपस्थित केले.

शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नागपूर पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “मला पोलिसांनी घडलेल्या प्रकरणाबद्दल माहिती दिली. पण मी त्यांच्या उत्तराने संतुष्ट नाही. माझा पहिला सवाल असा की, या संपूर्ण प्रकारात गाडीची माहिती ही एफआयआरमध्ये का नाही आली? तेव्हा ते म्हणाले की गाडीची माहिती आम्हाला नंतर मिळाली. ती माहिती जर तुम्हाला नंतर मिळाली तर मग आता तुम्ही त्यामध्ये नोंद करू शकता. पण ते करण्यासाठी तय्यार नाहीत.” अशी टीका त्यांनी यावेळी केली. “दुसरा प्रश्न असा की, पोलिसांनी मेडिकल चाचणी ही फक्त दोन लोकांचीच का केली? संकेत बावनकुळे यांची मेडिकल चाचणी का नाही झाली? तसेच, तिसरा प्रश्न म्हणजे अपघातग्रस्त गाडी ही घटनास्थळी पंचनामा न करता गॅरेजमध्ये का घेऊन जाण्यात आली? तसेच संकेत बावनकुळे आणि त्यांचे 3 साथीदार ज्या बारमध्ये बसले होते त्या बार आणि आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजचं काय झाले?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

पत्रकारांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “संकेत बावनकुळे यांच्या नावावर असलेल्या गाडीचा नंबर एफआयआरमध्ये नोंदवलेला दिसत नाही, असे विचारल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी फिर्यादीला त्यांच्या गाडीचा नंबरच माहिती नव्हता. आम्ही ज्यावेळी फिर्याद घेतो त्यावेळी फिर्यादीच्या वर्णनानुसार प्राथमिक गुन्हा नोंद करतो आणि तपासाला सुरूवात करतो, असे सांगितले. त्यानंतर कोणत्याही कार अपघातानंतर गाडीचा घटनास्थळी पंचनामा केला जातो. पण मग संकेत बावनकुळे यांची गाडी गॅरेजला कशी गेली? यावर पोलिसांनी माझा हा दावा फेटाळला.” अशी माहिती दिली. यावेळी, सुषमा अंधारेंनी तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवू का? असे विचारल्यानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली. संकेत बावनकुळे यांची मेडिकल चाचणी का करण्यात आली नाही? यावर पोलिसांनी संकेत घटनास्थळावरून पळून गेले होते. 12 तास उलटून गेल्यानंतर चाचण्यांचा काही उपयोग होत नाही म्हणून चाचणी केली नाही, असे पोलिसांनी उत्तर दिल्याचे अंधारेंनी सांगितले.