राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात
Shivswarajya yatra of NCP party Sharad Chandra Pawar party has started

 

पुणे:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या (Shivneri Forts) पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्याचा निर्धार करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मा. मंत्री अनिल देशमुख, खा. अमोल कोल्हे, आ. अशोक पवार, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, महिला अध्यक्षा रोहिणी खडसे आणि स्थानिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आज महायुती सरकारच्या काळात राज्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण, विद्यार्थी कोणताच घटक समाधानी नाही. सरकारने सर्वत्र भ्रष्टाचार माजवला आहे. राज्याची परिस्थिती दैनीय असताना राज्यात रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा जनतेमध्ये जनजागृती करणार.

महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्या पाठिशी ठाम आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे की हे दिल्लीतील सरकार आम्हाला नको आहे. आता राज्यातील हे युती सरकार जाणं हे आपल्या फायद्याचं आहे अशी खात्री जनतेला पटली आहे. त्यामुळे लोकांमध्ये लोकसभेपेक्षा जास्त उत्साह आहे. आमचा हा काही इव्हेंट नाही आम्ही साधेपणाने लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या यात्रेला कोणताही एक रंग नाही, जनतेचा वैविध्यपूर्ण रंग हाच आमच्या यात्रेचा रंग आहे, असेही त्यांनी सांगितले.