धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल | lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

तर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल

वकील असीम सरोदेंचा दावा

येत्या 14 ऑगस्टला सुप्रीम कोर्ट थेट निकाल देण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळेल. तर धनुष्यबाण चिन्ह हे गोठवलं जाईल, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी केला आहे. “शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या 14 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि चिन्हं संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. येत्या 14 ऑगस्टला सुप्रीम कोर्ट थेट निकाल देण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळेल. तर धनुष्यबाण चिन्ह हे गोठवलं जाईल”, असा मोठा दावा असीम सरोदे यांनी केली.

————

शेख हसीना भारतात शॉर्ट नोटीसवर
लोकसभेत परराष्ट्र मंत्र्यांचं स्पष्टीकरण
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशबाबत लोकसभेत सांगितले की, शेख हसीना शॉर्ट नोटीसवर भारतात आल्या आहेत. गेल्या 24 तासात ढाकाच्या संपर्कात आहेत. जूनमध्येच बहुतांश विद्यार्थी भारतात परतले आहेत. आम्ही बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही बांगलादेशातील भारतीयांच्या संपर्कात आहोत. बांगलादेश सोडून गेलेल्या शेख हसीना आणखी काही दिवस भारतात राहू शकतात. पण ती हिंडन एअरबेसमधून बाहेर पडणार नाही. हिंडन एअरबेसवरच गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेख हसीनासोबत आलेले काही नातेवाईक लंडनला रवाना झाले आहेत. कुठे जायचे हे शेख हसीना स्वतः ठरवतील.


भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली
दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती खालावली असून त्यांना मंगळवारी सकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंद्रप्रस्थ येथील अपोल रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागात त्यांना दाखल करण्यात आले आहे. न्यूरो सर्जन डॉ. विनीत सुरी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

————

भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ
अनेक भागात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता
उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातून काल एक लाख 25 हजार क्युसेक्स तर वीरधरणातून 41 हजार क्युसेक्स इतका विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला. अंबाबाई पटांगण येथील व्यास नारायण झोपडपट्टीतील अनेक घरात पाणी घुसलं आहे. व्यास नारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचं काल रात्रीच स्थलांतर केलं होतं.राज्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर अनेक भागात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची ‘येलो अलर्ट’ आहे. तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

———

महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या परतीसाठी प्रयत्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
सध्या भारताच्या शेजारील बांगलादेशातील परिस्थिती नियंत्रणात नाही. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर येथील सत्ता लष्कराच्या हाती गेली. तरीही देशातील व्यवस्था मोडकळीस आली असून सर्वत्र हिंसाचार पसरला आहे. बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य पाहता त्वरित कृतीची गरज अधोरेखित केली आहे. बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची संकलित यादी परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे त्वरित संपर्क आणि मदत करणे शक्य होणार आहे. सध्या केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आले आहे.