Home Breaking News जयंत पाटील थेट अजितदादांच्या आमदाराच्या घरी lokvahini News | लोकवाहिनी | Marathi...

जयंत पाटील थेट अजितदादांच्या आमदाराच्या घरी lokvahini News | लोकवाहिनी | Marathi News

जयंत पाटील थेट अजितदादांच्या आमदाराच्या घरी

बंद दाराआड राजकीय चर्चा

विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिलाय. अशातच त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांची त्यांच्या घरी जात भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय.
———–
चॅम्पिअन्स ट्रॉफी पाकिस्तानात खेळवली जाणार नाही

मोदींची पाकिस्तानवर आगपाखड

भारतीय क्रिकेट संघ चॅम्पिअन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही याबद्दल चर्चा रंगलेली असतानाच नरेंद्र मोदी यांनी शेजारी राष्ट्रावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने शहिदांना आदरांजली वाहिली असून, पाकिस्तानवर आगपाखड केली आहे. इतकं नुकसान होऊनही पाकिस्तानने काहीच धडा घेतलेला नसून, अद्यापही दहशतवाद्यांना मदत करत आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. चॅम्पिअन्स ट्रॉफी पाकिस्तानात खेळवली जाणार असून, ताणलेले संबंध पाहता भारतीय संघ तिथे जाण्याची शक्यता कमीच आहे. अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार असून, नरेंद्र मोदी यांच्या विधानाने हा निर्णय नेमका काय असू शकतो याचा अंदाज दिला आहे.
————
विदर्भात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार

ठाकरे गटाच्या ‘या’ दिग्गज नेत्याची पुन्हा घरवापसी

विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे . या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळ जवळ सर्वच महत्त्वाचे पक्ष कामाला लागले आहेत. सक्षम उमेदवाराची निवड, चांगली ताकत असलेले मतदारसंघाची निवड करण्याची प्रक्रिया इत्यादि बाबी राज्यातील पक्षांकडून चालू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षांकडून आतापासूनच रणनीती आखण्यात येत आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात महायुतील फारसे यश न आल्याचे बघायला मिळाले. तर महाविकास आघाडीने विदर्भात घरवापसी करत मोठे यश संपादन केले आहे.
————

आधारकार्डमुळे पुण्यातील हॉस्पिटल अडचणीत

डॉक्टरांना दिलेली क्लीन चीट वादाच्या भोवऱ्यात सापडली

पुण्यामधील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे पूजा खेडकर यांना पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून (व्हायसीएम) देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणावरुन वाद सुरु असतानाच आता हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी देलेल्या कागदपत्रांमध्येच घोळ असल्याचं समोर येत आहे. या प्रमाणपत्रासाठी वास्तव्याचा पुरावा म्हणून पूजा यांनी सादर केलेल्या आधार कार्डवर आणि रेशन कार्डवरील पत्ता वेगवेगळा असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळेच अशी तफावत असताना दिव्यांग प्रमाणपत्र कसं देण्यात आलं असा सवाल उपस्थित केला जात आहे.
—————-
अखिलेश यादवांची मोठी खेळी

15 खासदार असलेला पक्ष आणणार इंडिया आघाडीत

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. 15 खासदार असलेला पक्ष इंडिया आघाडीत आणत भाजपला मोठा झटका देण्याची तयारी अखिलेश यांनी केली आहे. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर काही अपक्ष खासदार इंडिया आघाडीसोबत आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे इंडिया आघाडीची ताकद हळूहळू वाढताना पाहायला मिळाली. सध्या अखिलेश यादव यांच्या मदतीने 15 खासदार असलेला पक्ष इंडिया आघाडीसोबत येण्याची शक्यता आहे.
——–
ऑगस्टपूर्वी मिळणार भाजपला नवीन कार्याध्यक्ष

नड्डा रहाणार सल्लागाराच्या भूमिकेत

केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपवली. त्यांना कॅबिनेट मंत्री बनवून आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. पण, जानेवारी 2025 पूर्वी भाजपच्या नवीन अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पक्षाने कार्याध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या काळात अनेक राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच पक्षाची जबाबदारी सांभाळण्यासाठी पक्षाला पूर्ण मुदतीचा पक्षाध्यक्ष हवा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
———

महायुतीचा 165 जागांवर विजय होईल

मंत्री हसन मुश्रीफांना विश्वास

राज्यात विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढती होणार असून, महायुतीला 165 जागा मिळतील असा दावा, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. या विधानसभेला राष्ट्रवादीचे दोन पक्ष , शिवसेनेचे दोन पक्ष, भाजप, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजण आघाडी आणि अपक्ष असे अनेक पक्ष आहेत. यामध्ये कोणीही थांबायला तयार नसल्यानं बहुरंगी लढती होतील असा दावा मुश्रीफ यांनी केला. राज्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी तिसरी आघाडी वगैरे काही करणार नाही. आम्ही महायुतीमध्येच लढणार असल्याचा निर्वाळा देखील मुश्रीफ यांनी दिला. आज ते पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी आले होते. त्यावेळी बोलत होते.